kavita - shailaja shewade

Saturday, July 07, 2007

प्राणपाखरू उडेल तेव्हा

प्राणपाखरू उडेल तेव्हा,

प्राणप्रियाचा संग असावा,

अत्न्याताच्या अंधाराला,

सावळ्याचा रंग दिसावा ।

अश्रुभरल्या नेत्री त्याच्या

कालिंदीचा डोह दिसावा,

देहभावना मुक्त होऊनी,

गोपी बनूनी सचैल न्हाव्यात ।

बिंदू बिंदूत प्रतिबिंब शोधणे,

आयुष्याचा ध्यास सरावा,

तुकडा तुकडा जुळून यावा,

एकसंघ घनश्याम दिसावा ।

नाद अनाहत ऐकू यावा,

सावळ्याचा संकेत असावा,

पेशीपेशीतून प्रतिसाद मिळावा,

देह आनंद तरंग बनावा ।

प्राणप्रियाच्या बाहुमधूनी,

शरीर अलगद गळून जावे,

अनंत हस्ते मुरलीधराने,

राधेला या कवेत घ्यावे ।

कवयित्री: सौ. शैलजा शेवडे