kavita - shailaja shewade

Saturday, June 23, 2007

व्याख्या

मातीच्या घड्यात भरून, आकाश कधी दाखवता येईल?

सांग कधी प्रेमाची,व्याख्या काय करता येईल?

पार्थिवाला असतो आकार,बध्द असते सीमांनी,

देवाघरच्या देण्याल ह्या, जाणायचं हळूवार मनांनी ।

जवळ येताच चुंबक,लोखंडाच्या रेणूत काय होतं?

उलथापालथ होते त्यात,आपोआप अन खेचलं ना जातं?

प्रेमातही असचं असतं,ह्र्दय आपोआप खेचलं जातं,

अनैच्छिक स्नायुंच्या क्रियांना,सांग कधी थोपविता येतं?

Labels:

Friday, June 22, 2007

आज अचानक तुला पाहता,

आज अचानक तुला पाहता,
जुळून आल्या सगळ्या तारा,
मनवीणा ही करू लागली,
दा दिर दारा,दा दिर दारा !
सुगंध यावा कोमलतेला,
पुलकित अंगे झेलून घ्यावा,
प्राजक्ताचा नाजूक मारा,
दा दिर दारा,दा दिर दारा !
संगीतमय अन तरीही रंगीत,
कारंज्याचे अपूर्व हे गीत,
आनंदाचा एकच नारा,
दा दिर दारा,दा दिर दारा!

मैफिल

रंगलेल्या मैफिलीची,ती त-हा मज न्यारी होती,
मी दिलेली वेदना, माझ्याहुनीही प्यारी होती,
वाहव्वा!जल्लोश होता,शब्दशब्दा दाद होती,
न जाणे कोणत्या सुरेने,झिंगलेली सारी होती।
मी दिलेल्या आसवांचे,शब्दमोती होत होते,
बाजारी अन मैफिलीच्या, लिलाव त्यांचे होत होते,
शुष्क डोळ्यांनी उभी गर्दीतली मी एक होते,
गणगोत ते तुजभोवती,दुर्लक्षित मी होत होते।
होष घेऊनी जाण्या तुझा,वेदनेची साकी होती,
माहित नव्हते तुला,ती कहाणी बाकी होती,
रिक्क्त ओंजळीत माझ्या,आसवांची ओल होती,
कैफियत माझीच ती,माझ्यापरी एकाकी होती।

रे खुळ्या या आसवांनो,

रे खुळ्या या आसवांनो,
बांध का हा पार केला,
ज्या कुणी हा वार केला,
तो कधीचा दूर गेला।
दो घडीची साथ त्याची,
दो घडीच्या सोबत्याची,
रात्रीपुरता टेकलेला,
लावून हुरहुर गेला।
रे सुरांच्या अक्षरांनो,
का उगा झंकारता,
ज्यामुळे हा रंग आला,
तोच वादी सूर गेला।
रे मनाच्या पाखरांनो,
खंतावता का शोधतांना,
लाट अशी झेपावली अन,
मिटवून गेली त्या खुणांना।

पहिला पाडवा

पहिला पाडवा
प्रीतीची ह्यांच्या,त-हाच ही न्यारी,
अशी ग कशी,तिकडची स्वारी।
पहिली दिवाळी,जमली सगळी,
लहानथोर अन वडिलमंडळी,
त्यांच्यादेखत छेड काढीता,
होई ग मी बावरी,
अशी ग कशी,तिकडची स्वारी।
रांगोळी मी काढत असता,
कमरेला ग बसला चिमटा,
रंगाचा मग उठे फराटा,
त्यांच्या गालावरी,
अशी ग कशी तिकडची स्वारी।
निलाजरेपण,कळस गाठता,
येता जाता मारीती धक्का,
नजर चुकविता सगळ्यांची मग,
उठली ग शिरशिरी,
अशी ग कशी,तिकडची स्वारी।
तेल तयांना लावत असता,
चावट कसले,उगाच हसता,
धडधड उरात थरथर हाता,
मी नवरी लाजरी,
अशी ग कशी तिकडची स्वारी।
उटणे लावूनी स्नान घालीता,
अवचित त्यांनी मला भिजवले,
ओलिचिंब अन मला बघुनी,
हसती ग सारी....!
अशी ग कशी तिकडची स्वारी।
कुणीतरी,
कुणासाठीतरी,
झुरते,पिचते,वेडावते।
कुणीतरी,
कुणालातरी,
सगळीकडे बघते।
बांसरीवाल्या क्रिष्णात,
देव्हा-यातल्या देवात,
तळपणा-या सूर्यात,
अन चमचमत्या पाण्यात।
कुणीतरी,
कुणावरतरी,
रुसते,चिडते,रागावते।
कुणीतरी,
कुणासाठीतरी,
तडफडते,तळमळते,तगमगते,
वेडावून जाते,वेडावून जाते।