kavita - shailaja shewade

Wednesday, August 22, 2007

तृषार्त मी अन अजूनही ।

इच्छिले जे, प्राप्त झाले, आणि थोडे अधिकही,

का तरी मन आर्त आहे, काय मागे अजूनही?

वाचली पोथ्या पुराणे, चाळीले अन ग्रंथही,

थांग तो अंतरीचा, नाही लागे अजूनही ।

हा मुळी चकवाच लागे, मानणे हे कठीण आहे,

फिरफिरूनी शोधिते मला, हरवले मी अजूनही ।

हा फुलांचा गालीचा, कुणी घातला माझ्याच साठी,

रुततात का पाकळ्या, कोडेच आहे अजूनही ।

भरभरूनी ओथंबलेला, वसुदेव पेला तो सुखाचा,

ओष्ठस्पर्शे रिक्त होतो, तृषार्त मी अन अजूनही ।

कवयित्री: सौ. शैलजा शेवडे