kavita - shailaja shewade

Wednesday, August 22, 2007

तृषार्त मी अन अजूनही ।

इच्छिले जे, प्राप्त झाले, आणि थोडे अधिकही,

का तरी मन आर्त आहे, काय मागे अजूनही?

वाचली पोथ्या पुराणे, चाळीले अन ग्रंथही,

थांग तो अंतरीचा, नाही लागे अजूनही ।

हा मुळी चकवाच लागे, मानणे हे कठीण आहे,

फिरफिरूनी शोधिते मला, हरवले मी अजूनही ।

हा फुलांचा गालीचा, कुणी घातला माझ्याच साठी,

रुततात का पाकळ्या, कोडेच आहे अजूनही ।

भरभरूनी ओथंबलेला, वसुदेव पेला तो सुखाचा,

ओष्ठस्पर्शे रिक्त होतो, तृषार्त मी अन अजूनही ।

कवयित्री: सौ. शैलजा शेवडे

Saturday, July 07, 2007

प्राणपाखरू उडेल तेव्हा

प्राणपाखरू उडेल तेव्हा,

प्राणप्रियाचा संग असावा,

अत्न्याताच्या अंधाराला,

सावळ्याचा रंग दिसावा ।

अश्रुभरल्या नेत्री त्याच्या

कालिंदीचा डोह दिसावा,

देहभावना मुक्त होऊनी,

गोपी बनूनी सचैल न्हाव्यात ।

बिंदू बिंदूत प्रतिबिंब शोधणे,

आयुष्याचा ध्यास सरावा,

तुकडा तुकडा जुळून यावा,

एकसंघ घनश्याम दिसावा ।

नाद अनाहत ऐकू यावा,

सावळ्याचा संकेत असावा,

पेशीपेशीतून प्रतिसाद मिळावा,

देह आनंद तरंग बनावा ।

प्राणप्रियाच्या बाहुमधूनी,

शरीर अलगद गळून जावे,

अनंत हस्ते मुरलीधराने,

राधेला या कवेत घ्यावे ।

कवयित्री: सौ. शैलजा शेवडे

Saturday, June 23, 2007

व्याख्या

मातीच्या घड्यात भरून, आकाश कधी दाखवता येईल?

सांग कधी प्रेमाची,व्याख्या काय करता येईल?

पार्थिवाला असतो आकार,बध्द असते सीमांनी,

देवाघरच्या देण्याल ह्या, जाणायचं हळूवार मनांनी ।

जवळ येताच चुंबक,लोखंडाच्या रेणूत काय होतं?

उलथापालथ होते त्यात,आपोआप अन खेचलं ना जातं?

प्रेमातही असचं असतं,ह्र्दय आपोआप खेचलं जातं,

अनैच्छिक स्नायुंच्या क्रियांना,सांग कधी थोपविता येतं?

Labels: